आजपासून शहरवासीयांना पेट्रोलसाठी १०८ रुपये १४ पैसे मोजावे लागणार

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): नागरिकांना आता पेट्रोलसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे.  यापूर्वी १०५ रुपयांत मिळणारे पेट्रोल आता १०८ रुपये ३४ पैशांवर पोहोचले आहे. त्यामुळे वाहनधारकांना आता प्रत्येक लिटरमागे तीन रुपये चौदा पैसे अधिक मोजावे लागत असल्याची माहिती पेट्रोल पंपचे व्यवस्थापक सतीश बांगड यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना दिली.

गेल्या दोन वर्षांपासून पेट्रोलच्या दरात मोठी वाढ झाली नव्हती. गेल्या दोन वर्षांपासून पेट्रोल चे दर १०५ रुपये होते. त्यात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नव्हती. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता नागरिकांना १०८ रुपये ३४ पैसे मोजावे लागणार आहे. पेट्रोलची अचानक झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या बजेटचे गणित पुन्हा कोलमडले आहे. दररोज कामानिमित्त दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर करणार्‍या नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आणि डिलिव्हरी सेवा देणारे युवक वाहनांवर अवलंबून आहेत. पेट्रोल दरवाढीमुळे आता त्यांच्या रोजच्या खर्चात वाढ होणार आहे. 

विशेषतः दुचाकीधारकांना महिन्याच्या इंधन खर्चासाठी अधिक पैसे खर्च करावे लागणार असल्याने चिंता वाढली आहे. दरवाढीचा परिणाम केवळ वाहनधारकांपुरता मर्यादित राहणार नसून वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाला, फळे, किराणा तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात महागाई आणखी वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान, शहरातील पेट्रोल पंपांवर नागरिकांमध्ये दरवाढीची चर्चा रंगताना दिसत आहे. अनेकांनी केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही केली जात आहे. 

उन्हाळ्याच्या कडक वातावरणात आधीच पाणीटंचाई, वीज समस्या आणि वाढती महागाई यामुळे नागरिक त्रस्त असताना आता पेट्रोल दरवाढीने सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. वाहन चालविणेही आता सामान्य नागरिकांसाठी महागडे होत चालल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.